गरीबांना अन्नधान्यांसोबतच महिलांना सॅनेटरी पॅडसुद्धा द्या, मानुषी छिल्लरची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमुळे सर्व काही बंद असल्यामुळे अनेकांना विविध समस्या सामोरे जावे लागच आहे. मात्र या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनासोबत सेलिब्रिटी मंडळी, व्यावसायिक विविध माध्यमातून गरजूंची मदत करत आहेत. यामध्येच आता माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने महिलांना सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे.

गरजूंना अन्नधान्य पुरविण्यासोबतच महिलांना सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करुन द्यावे अशी विनंती तिने केली आहे. या काळात महिलांना सॅनेटरी नॅपकिनची जास्त आवश्यकता आहे. देशावर कोरोना विषाणूचे संकट आहे. याकाळात सरकारकडून पुरविण्यात येणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये सॅनेटरी नॅपकिनचा समावेशाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या ज्या महिला सक्षम नाहीत अशा महिलांना सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

अन्य राज्यांच्या सरकारला विनंती आहे की त्यांनीही महिलांना सॅनेटरी पॅडस उपलब्ध करुन द्यावेत,असे मानुषी म्हणाली. मानुषी एका एनजीओची सदस्य असून या एनजीओच्या माध्यमातून स्थानिक महिला बायो डिग्रेडेबल सॅनेटरी पॅड तयार करतात. महिलांमध्ये आणि समाजामध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती व्हावी यासाठीही प्रयत्न करत आहेत.