Coronavirus : पाकिस्तानच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूला ‘कोरोना’ची बाधा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जगभरात कोरोनाने थैमान घातले असून सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिबृटीपर्यंत व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. अशातच आता पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर तौफिक उमरला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर तौफिकने स्वतःला क्वारंटाइन केले आहे. सध्या जगभरातील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. कोरोनाची लागण होणारा तौफिक उमर पहिला क्रिकेटपटू असल्याचे बोलले जात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला तौफिक उमर कारकिर्दीत पाकिस्तानी संघाचा महत्वाचा फलंदाज मानला जात होता. 2014 साली न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना अखेरचा ठरला होता. बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात 2001 साली तौफिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात तौफिकने 104 धावांची खेळी करत संघाच्या विजयाच मोलाचा हातभार लावला होता. मात्र सतत होणार्‍या दुखापतींमुळे तौफिक संघात स्थान कायम राखू शकला नव्हता. 2016 साली तौफिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. दरम्यान, पाकिस्तानातही कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. लॉकडाउनमुळे क्रिकेट स्पर्धा बंद असल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आयसीसी क्रिकेटची गाडी पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करत आहे.