विराटसोबत क्रिकेट खेळायला मिळणे हे भाग्यच : विल्यमसन

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ या तिघांमध्ये कायमच अव्वल क्रमांकासाठी चढाओढ असते. आधुनिक क्रिकेटमध्ये हे तीन खेळाडू सर्वोत्तम असल्याचे मत बहुतांश क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्टीव्ह स्मिथने, विराट कोहली हा धावांचा पाठलाग करण्यात सर्वोत्तम असल्याची स्तुती केली होती. त्यानंतर आता विराट कोहलीसोबत क्रिकेट खेळायला मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे मत विल्यमसनने व्यक्त केले आहे.

आम्हाला एकमेकांविरुद्ध खेळायला मिळते ही बाब खूपच भाग्याची आहे. युवा क्रिकेटपटू असताना क्रिकेटच्या मैदानावर भेटणे आणि त्यानंतर एकमेकांच्या प्रगतीचा उंचावत चाललेला आलेख पाहणे हे खूप सुखदायक असते. 19 वर्षाखालील क्रिकेट खेळत असल्यापासून कोहलीची झालेली प्रगती मी पाहिलेली आहे. आम्ही एकमेकांविरूद्ध दीर्घकाळापासून खेळतो आहोत. त्यामुळे सामन्यादेखील आम्हाला एकमेकांविरोधात उभे राहायला मजा येते.

गेले काही वर्षे आम्ही एकमेकांशी क्रिकेटबद्दल गप्पा मारतो. त्यात आम्हाला एक लक्षात आले की आमच्या दोघांच्या खेळाची पद्धत आणि देहबोली वेगवेगळी आहे, पण तरीदेखील बर्‍याचशा गोष्टींमध्ये आमची मते ही सारखीच आहेत, असेही विल्यमसनने सांगितले. 2008 साली मलेशियात झालेल्या 19 वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये विल्यमसन आणि कोहली संघाचे नेतृत्व करत होते. त्या स्पर्धेत भारतीय संघाचे विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. तेव्हापासून हे दोघेही आधुनिक क्रिकेटमधील उत्तम क्रिकेटपटू म्हणून नावारूपाला आले आहेत.