आर्थिक वादातून दिली कंपनी जाळण्याची सुपारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – औषध कंपनीच्या मालकाबरोबर असलेल्या आर्थिक वादातून एकाने चक्क कंपनी जाळण्यासाठी सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी मुख्य सुत्रधारासह चौघांना अटक केली आहे.

सुत्रधार कमलेश महेश पारेख (वय ४१ ), लकीराज दाऊलाल राजपुत (वय २१), राहुल मुन्नालाल सातपुते (वय २४) व अक्षय यशवंत चव्हाण (वय २१,  सर्व रा. बोरीवली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा – मोदींच्या लाटेवर आलेल्यांनी लावली फक्त ‘वाट’ : अजित पवार 

याप्रकरणी जयंतीलाल वैष्णव (रा. आनंदनगर, दहिसर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, वैष्णव यांची काशिमीरा येथील दोढिया पेट्रोल पंपाजवळ जयको केमिकल नावाची औषध कंपनी आहे. कंपनीत १० फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक आग लागली. सुदैवाने ही बाब तातडीने लक्षात आल्याने ती आटोक्यात आणता आली. यावेळी कंपनीत २५ कामगार काम करत होते. आग लागली त्याच्या पासून काही अंतरावर केमिकलचा साठा होता. त्याच्यापर्यंत आग पोहचली असती तर मोठा अनर्थ घडला असता. आग विझविल्यानंतर त्याची चौकशी करीत असताना कंपनीतील सीसीटीव्हीमध्ये एका कारमधून काही अनोळखी लोक कुंपणाची जाळी उचकटून आत प्रवेश करतात. तेथील ज्वलनशील केमिकल सांडून कापडाचे पेटते बोळे करुन कंपनीवर फेकत असल्याचे दिसून आले होते.

सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती रात्रीचा अंधार असल्याने स्पष्ट दिसत नव्हते. मात्र, यावरुन आग अपघातातून लागली नसून ती मुद्दाम लावण्यात आली हे स्पष्ट झाले. यावरुन जयंतीलाल वैष्णव यांनी तशी फिर्याद पोलिसांकडे दिली. पोलिसांनी वैष्णव यांच्याशी कोणा कोणाचा वाद सुरु आहे, याची माहिती घेतली. त्यात कमलेश पारेख याचे नाव समोर आले. या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास करताना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी अगोदर तिघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत पारेख यानेच आग लावण्यासाठी सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पारेख याला अटक करण्यात आली.

पारेख हा मुख्य सुत्रधार असून तो गुंतवणुकदार आहे. त्याचे पैसे अडकले असल्याने जयंतीलाल वैष्णव यांच्याबरोबर वाद सुरु होता. या वादातूनच त्याने कंपनी जाळण्याची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.