‘मोफत धान्य वितरण योजना’ 30 नोव्हेंबरला संपेल काय ? जाणून घ्या सर्व काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (PMGKAY) अंतर्गत मोफत धान्य देण्याची योजना आता बंद होणार आहे. देशात लॉकडाउन (Lockdown) च्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच मोदी सरकार (Modi Government) जवळपास 81 कोटी शिधापत्रिकाधारकांना (Ration Card Holders) मोफत धान्य (Free Food) वाटप करत आहे. ही योजना विशेषत: स्थलांतरित कामगार आणि गरीब लोकांसाठी सुरू केली गेली होती. अन्न, ग्राहक व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेची तारीख यापुढे वाढविण्यात येणार नाही. मोफत धान्य देण्याची सरकारची ही योजना आता 30 नोव्हेंबरला संपणार आहे.

मोफत रेशन देण्याची योजना 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ विनाशुल्क वाटप करण्यात येत होते. आता ही योजना 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. ही योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ‘या योजनेला यापुढे राबविण्यात येणार नाही. ज्या लोकांनी कोणत्याही कारणास्तव रेशन घेतले नाही, त्यांना त्यांच्या हिश्श्याचे रेशन विनामूल्य दिले जाऊ शकते. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे स्वस्त दराने जे रेशन दिले जात होते, ते यापुढेही मिळत राहील. पीएमजीकेएवायअंतर्गत मोफत रेशन वितरण करण्याची योजना आता 30 नोव्हेंबरनंतर बंद केली जाईल.’

यावर्षी मार्च महिन्यात कोरोना साथीच्या काळात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा केली होती. याअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे आणि ज्यांच्याकडे नाही, त्यांना एप्रिलपासून दरमहा 5 किलो गहू/ तांदूळ प्रतिसदस्य आणि एक किलो हरभरा डाळ मोफत देण्यात येत होती. हे मोफत धान्य रेशनकार्डावर मिळणाऱ्या धान्याच्या सध्याच्या कोट्याव्यतिरिक्त आहे.

You might also like