फडणवीसांची ‘मन की बात’ ! महाराष्ट्रात मोफत ‘लस’ देणं गरजेचं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यात बिहारच्या जनतेला कोरोनाची लस (corona vaccin) मोफत देण्याचे आश्वासन दिल्याने कोरोना संकटात भाजपने कोरोनाचे (Corona) राजकारण केल्याचे दिसून येत आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही पत्रकार परिषदेत या वृत्ताला दुजोरा देत मतदारांना भाजपाला मत देण्याचे आवाहन केलं आहे. भाजपच्या या निर्णयावरुन विरोधकांकडून भाजपवर टीका होत आहे. तर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाराष्ट्रालाही (maharashtra) मोफत (free) लस मिळायला हवी, अशी मन की बात सांगितली आहे.

बिहारमधील मोफत लसीच्या घोषणेवरुन विरोधकांनी भाजपाला चांगलंच धारेवर धरलं आहे. या मुद्दावरुन सर्वच राजकीय पक्ष भाजपावर टीका करत आहेत. राज्यातील, इतर राज्यांचे काय, इतर राज्यांना मोफत लस देणं, केंद्र सरकारची जबाबदारी नाही, असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे. तर शिवसेनेनेही सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपाने मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरु केले आहेत. बिहारला लस मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपच्या बिहारी घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची राष्ट्रीय भूमिका असायला पाहिजे. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे, अशा शब्दात सामना अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे.

बिहारमध्ये मोफत लसीची घोषणा केल्या संदर्भात बिहारचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, महाराष्ट्रालाही मोफत लस देणं गरजेचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही लोकं महाराष्ट्र सोडून जगभर बोलतात, तामिळनाडूतील राज्य सरकारने मोफत कोरोना लसीची घोषणा केलीय, आता हेच दुपट्टी लोक टीका करत आहेत, असे म्हणत विरोधी पक्षांकडून सोयीनुसार भूमिका घेतली जात असल्याचे फडणवीस यांनी सुचवलं. कोरोना संदर्भात केंद्र सरकार नक्कीच योजना आणेल, पण राज्यानेही त्यात भर घालावी लागेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.