मोस्ट वाॅन्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला परदेशातून अटक

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – नव्वदीच्या दशकात मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात दबदबा असणारा कुख्यात गुंड रवी पुजारी याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. या वृत्ताला तपास यंत्रणांनी दुजोरा दिला असून बंगलुरु पोलिसांनी काढलेल्या रेड कॉर्नर नोटिसीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
रवी पुजारीवर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेल आणि फसवणुकीचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार, २२ जानेवारीला सेनेगल पोलिसांनी रवी पुजाराला अटक केली. यानंतर २६ जानेवारीला भारताला याबाबत कळवण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेला रवी पुजारी ऑस्ट्रेलियात लपून बसल्याचा तपास यंत्रणांचा अंदाज होता. त्यादृष्टीने भारतीय तपास यंत्रणांकडून त्याचा शोध सुरु होता. भारतीय गुप्तचर यंत्रणा सतत रवी पुजारीवर लक्ष ठेवून होत्या. तो सेनेगलमध्ये असल्याचे समजण्यापूर्वी तो पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हापासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या.
गुन्हेगारी विश्वाचा कणा मोडण्यासाठी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाईला सुरुवात केली तेव्हा पुजारी बंगळुरूत पळून गेला. मंगलोरचा रहिवाशी असलेल्या रवी पुजाराला इंग्रजी आणि कन्नड भाषा चांगल्या प्रकारे अवगत आहेत. गेल्या वर्षी जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद, शेहला रशीद आणि जिग्नेश मेवाणी यांना रवी पुजारीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. याशिवाय, २००९ ते २०१३ या काळात पुजारीने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना खंडणीसाठी धमकावले होते.
गुन्हेगारी विश्वात आल्यानंतर रवी पुजारीने काही काळ छोटा राजन याच्याबरोबर काम केले. २००१ पासून रवी पुजारी त्याच्यापासून वेगळा झाला. त्यानंतर छोटा राजनला इंडोनेशियाच्या बाली येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर छोटा राजनला भारताच्या ताब्यात देण्यात आले होते. सध्या त्याला नवी मुंबई येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे.