पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियटमधील ‘मायामी’ पबमध्ये बाऊन्सरकडून युवतीचा ‘विनयभंग’

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – सेनापती बापट रस्त्यावरील प्रसिद्ध अशा जे. डब्ल्यु मॅरियटमधील मायामी पबमध्ये आलेल्या तरुणीचा दोन बाऊन्सरकंडून विनयभंगकरून तिच्या मित्राला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या महिन्यात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी बाऊन्सवर भादवी कलम 354, 323, 504 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी आणि तिचा मित्र गेल्या महिन्यात (26 जानेवारी) मायामी डान्सिंग पबमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, डान्स झाल्यानंतर तरूणीच्या पोटात दुखत असल्याने ती टेबल उभा राहिली होती. यावेळी दोन बाऊन्सर तिच्याजवळ आले. तसेच, त्यांनी तरूणीचा विनयभंग केला. तरूणीच्या मित्राने विरोध केल्यानंतर त्याला शिवीगाळकरून मारहाण करण्यात आली. हा प्रकार घडल्यानंतर त्या दोघांना हॉटेलच्या बाहेर काढण्यात आले. त्याठिकाणीही त्यांना शिवीगाळ करण्यात आली.

दरम्यान, तरूणी त्याचवेळी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गेली. मात्र, हे प्रकरण हॉटेलच्या मॅनेजमेंटकडून मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला स्थानिक पोलिसांची साथ मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्या तरुणीला काही पैसेही हॉटेलकडून ऑफर करण्यात आले होते. परंतु, हॉटेलकडून त्याचेच रेकॉर्डिंगकरून त्यांनाच गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती. स्थानिक पोलीसांचीच साथ असल्याने हे प्रकरण त्यावेळी मिटविण्यात आले.

मात्र, त्यानंतर वरिष्ठांकडून हे प्रकरण आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एकीकडे रात्रीच्या पबवर अधिकारी कारवाई करत असताना त्याठिकाणी अश्लील प्रकार घडत असल्याचे दिसत आहे. त्याला स्थानिक पोलिसांचीच साथ मिळते, हेही यावरून दिसत आहे.