समुद्रकिनारी चक्क सोन्याचे कण, गावकऱ्यांची ‘चांदी’

काकीनाडा : पोलिसनामा ऑनलाईन – अलीकडेच झालेल्या निरव चक्रीवादळाचा तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या किनारी भागांना तडाखा बसला आहे. अनेक गावाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, एका गावाला हे चक्रीवादळ वरदान ठरले आहे. आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उप्पाडा गावानजीक असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर चक्रीवादळानंतर चक्क सोन्याचे कण आढळू लागले आहेत! रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या उप्पाडा गावातील मच्छिमारांना गेल्या आठवड्यात समुद्रकिनाऱ्यावर चक्क सोन्याचे कण सापडू लागले. किनाऱ्यावर सोने सापडत असल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. अन जो तो आपले नशीब आजमावण्यासाठी किनाऱ्याकडे धावू लागला.

समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गावकऱयांनी गर्दी केली होती. लाटांनी किनाऱ्यावर आणलेला गाळ चाळून त्यातून सोने शोधण्याची धडपड सुरू झाली. आतापर्यंत ५० लोकांना प्रत्येकी साडेतीन हजार रुपये किमतीचे सोने सापडल्याचा दावा येथील स्थानिकांनी केला आहे. मात्र, प्रत्येकाला सोने मिळालेच असे नाही. तरीही किनाऱ्यावर सोन्याचा शोध सुरूच आहे.

समुद्रकिनारी सोने सापडण्याबाबत अणेकी तर्क वितर्क
समुद्रकिनाऱ्यावर सोने का सापडत आहे, यामागील ठोस कारण कोणाला सांगता आलेले नाही. मात्र, अनेक जण आप आपल्या परीने याचे उत्तर देत असतो. येथील किनारी भागात जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अलीकडेच दोन मंदिरे पडल्याच्या घटना घडल्या. तसेच तुफानी वाऱ्यांमुळे घरे कोसळण्याचेही प्रकार घडले आहेत. पडलेली घरे व मंदिरे समुद्री लाटांनी आत ओढून नेली. नवीन वास्तू वा मंदिर बांधताना पायाभरणीवेळी सोने अर्पण करण्याची गावात प्रथा आहे. कदाचित समुद्राच्या उदरात गडप झालेल्या या घर वा मंदिराच्या पायाभरणीचे सोने समुद्री लाटा किनाऱ्यावर घेऊन येत असतील, असा अंदाज स्थानिक पोलिस व्यक्त करत आहेत. दरम्यान, महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी या परिसराची पाहणी करणार आहेत.