रेकॉर्डब्रेक ! सोन्याचा दर 55 हजारांच्या उंबरठयावर तर चांदी 1300 रूपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाच्या काळात सोन्याला मागणी वाढल्याने सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. जागतिक पातळीवर सोन्याला जास्त मागणी वाढल्याने बुधवारी एकाच दिवसात सोन्याच्या भावात पुन्हा 1400 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोने 54 हजार 900 रुपये प्रतितोळा होऊन 55 हजारांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. मंगळवारी मोठी भाववाढ झालेल्या चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. चांदीचा दर 1300 रुपयांनी कमी होऊन चांदी 66 हजार 200 रुपये प्रतिकिलोवर आली आहे. दलालांनी चांदीपेक्षा सोन्याकडं कल वाढवल्याने चांदीच्या दरात घसरण होऊन सोनेच्या किंमती वधारल्या आहेत.

कोरोनाच्या काळात विदेशी बँकांनी व्याजदरात घटविल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये काही दिवसांपासून वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धातूमधील वाढती गुंतवणूक पाहता दलाल अधिक सक्रिय झाल्याने जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये उलाढाल वाढली आहे.

महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याचे नवे विक्रम

जुलैच्या पहिल्या आठवड्यात सोने 49 हजार 200 वर होते. त्यानंतर 14 जुलै रोजी सोन्याचे भाव 800 रुपयांनी वाढून ते 50 हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहचले होते. त्यानंतर 21 जुलै रोजी पुन्हा एक हजाराने वाढ झाली आणि सोने 51 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. यानंतर 28 जुलै रोजी तब्बल अडीच हजार रुपयांनी वाढ होऊन सोन्याचे दर 53 हजार 500 रुपये झाले. आता आज (बुधवार) तर एकाच दिवसात आणखी 1400 रुपयांची वाढ होऊन सोने 55 हजारांच्या उंबरठ्यावर येऊन 54 हजार 900 रुपये प्रति तोळा झाले आहे.

चांदीत अनेक दिवसांनी घसरण

सोन्यासोबत चांदीमध्ये देखील वाढ सुरु होती. 7 जुलै रोजी चांदी 50 हजार 500 रुपयावर होती. त्यानंतर 14 जुलै रोजी चांदीच्या भावात 3 हजार 500 रुपयांची वाढ झाली. यानंतर चांदीचा भाव 54 हजार रुपये प्रतिकिलोवर पोहचला. त्यात 21 जुलै रोजी आणखी 6500 रुपयांची वाढ होऊन ती 60 हजारांच्याही पुढे गेली. त्यावेळी चांदी 60 हजार 500 रुपये प्रति किलोवर पोहचली होती. 28 जुलै रोजी थेट सात हजार रुपये प्रति किलोने वाढ होऊ चांदी 67 हजार 500 रुपयांवर पोहचली होती. मात्र, दलालांनी चांदीपेक्षा सोन्यात अधिक गुंतवणूक वाढवल्याने बुधवारी(दि.29) चांदीत 1300 रुपयांची घसरण झाली. आज चांदीचा दर 66 हजार 200 रुपये प्रतिकिलो इतका आहे. मागील काही दिवसांपासून चांदीच्या दरात होत असलेली वाढ आज अनेक दिवसांनी कमी झाल्याचे पहायला मिळाले.

तर दिवाळीत सोने 61 हजारांवर

जागतिक पातळीवर सोने खरेदीची अशीच स्थिती व अशीच भाववाढ होत राहिल्यास दिवाळीमध्ये सोने 61 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचेल असे संकेत दिले जात आहेत.