खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात मोठी ‘घसरण’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अनलॉक 1 मधील दुसऱ्या टप्प्यात सुवर्णबाजार सुरु होताच 50 हजारावर पोहचलेल्या चांदीच्या भावात दुसऱ्याच दिवशी दीड हजार रुपये प्रति किलोने, तर सोन्याच्या दरात 800 रुपयांच्या जवळपास प्रति तोळ्याने घसरण झाली. त्यामुळे चांदी 48 हजार 500 तर सोने 46 हजार 500 रुपयांवर आले आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या सुवर्णबाजार शुक्रवारी (दि.5) सुरु झाला. लॉकडाऊन ते अनलॉक या अडीच महिन्यांच्या कालावधीत चांदीचे दर 11 हजार रुपये प्रति किलोने वाढून 39 हजार रुपयांवरून 50 हजारांवर पोहोचले होते. विदेशातून आवक नसल्याने व सुवर्णबाजार देखील बंद असल्याने बाजारपेठेत सोने येत नव्हते. त्यामुळे सोने-चांदीची चणचण निर्माण झाली आणि याचा परिणाम भाव वाढले. त्यामुळे लॉकडाऊननंतर सुवर्णबाजार उघडताच चांदीला चांगलीच चकाकी आली व ती थेट 50 हजारावर पोहचली होती.

सोन्याच्या भावात देखील अशाच प्रकारे वाढ झाली. सोन्याचे भाव 47 हजार 300 रुपयावर पोहचले. चांदी थेट 50 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली असली तरी बाजार सुरु झाल्याने मोडच्या माध्यमातून बाजारात चांदीची उपलब्ध होईल, वाढलेले हे भाव कमी होतील, असे संकेत सुवर्ण व्यवसायिकांनी दिले होते. त्यानुसार बाजार सुरु होण्याच्या दुसऱ्याच दिवशी चांदीच्या भावात दीड हजार रुपयांची घसरण झाली व चांदी 48 हजार 500 रुपये प्रतिकिलोवर आली.

अशाच प्रकारे शुक्रवारी 47 हजार 300 रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात 800 रुपयांची घसरण पहायला मिळाली. सोन्याचे भाव 800 रुपयांनी घसरून 46 हजार 500 रुपयांवर आले. सुवर्णबाजारात सोने-चांदीची आवक सुरु होण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणा झाली. 5 जून रोजी 75.65 रुपये असलेल्या डॉलरचे दर आज (शनिवार) 75.56 रुपयांवर आले. 9 पैशांनी रुपयात सुधारणा झाल्यानेही सोने-चांदीचे भाव कमी होण्यास मदत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.