विक्रमी वाढ ! सोन्याचा दर 44,800 वर

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सध्या सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोनं तब्बल 44 हजार 700 रुपये प्रती तोळा पर्यंत पोहोचले आहे. तर चांदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली असून जवळपास चांदी 2 हजार रुपयांनी वाढून 42 हजार 300 रुपये प्रती किलोवर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत सोने-चांदीचे भाव कमी होत गेले होते, त्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर घटणारी औद्योगिक मागणी होती. दरम्यान मुंबईतील सगळी दुकाने कोरोनाच्या कहरामुळे बंद झाली, त्यामुळे सोने-चांदीची आवक थांबली. परंतु ही परिस्थिती सध्या सोने-चांदीसाठी अनुकूल ठरत आहे. त्यामुळेच सोन्याचे भाव इतके वाढत आहेत. आता 24 कॅरट सोन्याचा दर 44 हजार 700 रुपयांवर पोहोचला आहे.

कोरोना या प्राणघातक विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जगातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. मात्र, सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली असून हे दर आता दोन हजार रुपयांनी वाढून सोने प्रतितोळा 45,724 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 43,345 पर्यंत पोहोचले आहेत.

लॉकडाऊनमुळे व्यवहार पूर्णपणे बंद

सध्या जगभरातील देशांनी कोरोना विषाणू विरोधात युद्ध पुकारले असून विषाणूचा नायनाट करण्यासाठी सर्वच देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत आणि अशातच आता सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान देशात सणासुदीला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी-विक्री होत असते. यावेळी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी-विक्री झाली असती, परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आणि सोन्याची खरेदी-विक्री झाली नाही. सध्या जरी सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या असतील, तरीदेखील प्रत्यक्ष खरेदी-विक्री कधी होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहेत.