वानवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांचे दागिने पळविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात लुटमार तसेच मोबाईल चोर्‍या करणार्‍या चोरट्यांसोबतच महिलांचे दागिने पळविणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वानवडीत ज्येष्ठ महिलांचे दागिने चोरल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दत्तमंदीर आणि धोबीघाट परिसरात हे प्रकार घडले.

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जेष्ठ महिला हळदी  कुंकवाच्या कार्यक्रमानंतर दत्त मंदीराच्या रस्त्याने घराकडे जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बी.डी. कांबळे अधिक तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत काल सकाळी अकराच्या सुमारास एक महिला गोळीबार मैदान ते धोबाघाट असा पीएमपीलए प्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेच्या हातातील 50 हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरुन नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बी.टी. पोटवडे अधिक तपास करीत आहेत.