MP : गोपाळ भार्गव यांना ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत ‘शिवराज’ सरकारमधील 6 मंत्री ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

भोपाळ : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसचा कहर सतत वाढत चालला आहे. मध्य प्रदेशात तर सरकारमधील मंत्र्यांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. आता शिवराज सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. मध्य प्रदेश सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री गोपाळ भार्गव यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

पीडब्ल्यूडी मंत्री गोपाळ भार्गव यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, त्यांचा कोविड-19 चा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सावधगिरी म्हणून ते हॉस्पीटलमध्ये दाखल होत आहेत. सोबतच त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना तपासणी करून घेण्यास आणि होम क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे.

गोपाळ भार्गव यांनी सांगितले की, त्यांनी त्यांची, आपल्या कुटुंबाची आणि जवळच्या स्टाफची कोविड टेस्ट, अँटीजन टेस्ट किटच्या माध्यमातून केली आहे. ज्यामध्ये त्यांचा प्राथमिक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेसाठी उपस्थित होईन.

आतापर्यंत 6 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
आतापर्यंत शिवराज कॅबिनेटमधील 6 मंत्री कोरोना व्हायरसने पॉझिटिव्ह झाले आहेत. यामध्ये अरविंद भदौरिया (सहकार मंत्री), तुलसी सिलावट (जलसंधारण मंत्री), रामखेलावन पटेल (अल्पसंख्यक कल्याण मंत्री), विश्वास सारंग (वैद्यकीय शिक्षण मंत्री), मोहन यादव (उच्च शिक्षण मंत्री) आणि आता गोपाळ भार्गव (पीडब्ल्यूडी मंत्री) यांचा समावेश आहे. याशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सुद्धा कोरोना व्हायरसने संक्रमित आढळले आहेत.