5 दिवसांच्या आत सुरू करावेत ‘मेडिकल कॉलेज’; जाणून घ्या केंद्राच्या राज्यांना काय आहेत सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना साथीच्या तीव्र संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या शिफारशीनुसार वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्यांना 1 डिसेंबर किंवा त्याआधी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास सांगितले आहे.

कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता राज्यांना 31 डिसेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. परंतु अशा परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत, जेणेकरून वैद्यकीय पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. केंद्राने राज्य सरकारांना आतापासून यासाठी प्रारंभिक पावले उचलण्यास सांगितले आहे. तसेच राज्यातील कोरोना विषाणूविषयी प्रोटोकॉल व कडक मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करावीत, असेही सांगितले आहे.

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासाठी गृह मंत्रालयाची परवानगीही घेतली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्रानुसार राज्यांना मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात नॉन-कोविड बेड्स उपलब्ध करण्याची सूचना देण्यात आली आहे. केंद्र सरकारची ही सूचना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या शिफारशीवर जारी करण्यात आली आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे बर्‍याच विद्यार्थ्यांनी आणि वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचे वर्ग सुरू करण्यासाठी संपर्क साधला आहे.

आयोगाने असेही म्हटले आहे की, प्रशिक्षणाच्या दिरंगाईचा आगामी काळात पीजी आणि सुपर स्पेशालिटी कोर्सेसवर वाईट परिणाम होईल. त्यामुळे 1 डिसेंबरपासून चालू सत्रासाठी महाविद्यालये सुरू केली जातील. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानुसार 2020-21 च्या नवीन बॅचचे वर्ग 1 फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाले पाहिजेत. पीजी कोर्सेससाठी 2020-21 चे सत्र 1 जुलै 2021 पासून सुरू झाले पाहिजेत. यासाठी 2020-21 ची नीट पीजी परीक्षा मार्च-एप्रिल 2021 मध्ये होणार आहे.

त्याचबरोबर महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, 2020 सत्राच्या एमबीबीएस बॅचचे क्लिनिकल प्रशिक्षण पूर्ण होऊ शकलेले नाही. त्याशिवाय विद्यार्थी पुढील वर्षी होणारी नीट पीजी (NEET PG 2021) मध्ये सामील होऊ शकणार नाहीत. यामागील मुख्य कारण म्हणजे पदवीधर (MBBS) विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले जावे. राजेश भूषण यांचे म्हणणे आहे की, ‘सर्व महाविद्यालये केंद्र व राज्य सरकारांनी जारी केलेल्या सोशल डिस्टेन्सिंग आणि कोविड संसर्ग रोखण्याच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करतील.