…अन्यथा 10 तारखेनंतर रस्त्यावर उतरू : प्रकाश आंबेडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचा कारभार सध्या रामभरोसे सुरु आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही. तसेच सरकारने कोविड कोविड करणे थांबवावे, अन्यथा १० तारखेनंतर वंचित बहुजन आघाडी राज्यातील सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा गंभीर इशारा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलतं होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोरोना काळात पंतप्रधान कार्यालयापासून ते जिल्हा पातळीवर चालढकल केली जात आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही. राज्याचा कारभार रामभरोसे सुरु असून, शासन कोणत्याही प्रकारचे निर्णय घेत नाही. सर्व निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडले आहेत. या परिस्थितीत राज्य सरकारने एक वेळापत्रक ठरवून द्यावे, की या दिवशी सर्व व्यवहार सुरु होतील असे म्हणत, फक्त मोबाईलच्या कॉलरट्यून वर देशात अनलॉक आहे म्हणून सांगू नका प्रत्यक्षात ते लागू करावे, अशी खरमरीत टीका त्यांनी सरकारवर केली आहे.

इतर देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनची आपण कॉपी करतो की काय अशी आता शंका येऊ लागली आहे. कोरोना संसर्गाचा परिणाम आहे की, नाही याची चर्चा आता नागरिकांनी करावी. २०१९ च्या वर्षभरात जेवढी माणसं दगावली तेवढीच २०२० च्या कोरोना संसर्गाच्या तीन महिन्यात दगावली आहेत. म्हणून सरकारने कोरोना तुन आता बाहेर पडून सगळीकडचे व्यवहार सुरळीत करावे. अन्यथा दहा तारखेनंतर आम्ही लॉकडाऊन पाळणार नसल्याचं, आंबेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं.