7/12 कोरा होणार नाहीच, सरकारनं शेतकर्‍यांच्या तोंडाला फक्त पानं पुसली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज महाविकास आघाडी सरकारचे पहिले बजेट विधानसभेत सादर करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वपूर्ण बाबी येथे अधोरेखित केल्या. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ‘मराठवाडा, विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्राचा सरकारला विसर पडला आहे. या तिन्ही विभागांतील नागरिकांना अर्थसंकल्पात काहीही मिळालं नाही. कोकणाचा उल्लेख केला, पण कोकणच्या वाट्यालाही काही मिळालं नसल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले कि, ‘अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प विधानभवनात सादर केला हा अर्थसंकल्प नसून जाहीर सभेतलं भाषण होतं. कारण, कोणतीही आकडेवारी अर्थसंकल्पीय भाषणात दिसून आली नाही. सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ पोकळ भाषण आहे. शेतकऱ्यांच्या तोंडालाही सरकारने पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांच्या बाधांवर जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली होती, पण या घोषणांचा विसर सत्ताधारी नेत्यांना पडला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 1 नवा पैसा सरकारने दिला नाही. पीक कर्जाव्यतिरिक्त इतर कुठल्याही कर्जाची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा सात-बारा कधीच कोरा होणार नाही, हे अर्थसंकल्पावरुन स्पष्ट होताना दिसत असल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हंटल आहे.