रोखीने (कॅश) व्यवहार करताय तर ‘हे’ लक्षात ठेवा ; वर्षभरात १० लाखांचा कॅश व्यवहार केल्यास भरावा लागणार टॅक्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काळ्या पैशाला आळा बसावा आणि डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ व्हावी यासाठी नवीन नियम बनवण्यात येणार आहे. बँक खात्यातून १० लाख रुपयांची रोख रक्कम काढल्यास त्यावर टॅक्स लावण्याचा विचार नवे सरकार करीत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प ५ जुलैला जाहीर होणार असून, या अर्थसंकल्पात सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आरबीआयने नुकतेच एनईएफटी आणि आरटीजीएसवरील शुल्क माफ केले होते. त्यानंतर आता वर्षभरात तुम्ही तुमच्या बँक खात्यातून १० लाख रुपयांची रोख रक्कम काढल्यास तुम्हाला आता टॅक्स भरावा लागण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसविण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार आहे. बँकेतून काढलेल्या पैशावर कर लावल्यास लोक डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्यास प्राधान्य देतील. त्यामुळे काळ्या पैशाला आळा बसेल आणि डिजिटल व्यवहार वाढतील.