हिरव्या पालेभाज्या असतात आरोग्यासाठी हितकारक

हिरव्या पालेभाज्यांमधील 'हे' घटक असतात आरोग्यासाठी चांगले

पोलिसनामा ऑनलाईन टीम- हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी आवश्यक असून यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक भरपूर असतो. हा घटक शरीरातील घातक विषाणूंवर हल्ला चढवून त्यांना नष्ट करतो. शरीरासाठी उपयुक्त अशी विविध जीवनसत्त्वे पालेभाज्यांमध्ये असतात. चुका, मेथी, अळू, शेपू, कोथिंबीर यासह अशा अनेक पालेभाज्या आहेत ज्यांच्यामुळे आपले आरोग्य अधिक चांगले राहू शकते.

पालेभाज्यांचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. नेहमी वापरता येण्यासारख्या शंभरावर भाज्या असून केवळ निवडायचा त्रास, आवडत नाहीत म्हणून त्या खाण्याचे टाळले जाते. पालेभाज्या म्हणजे जीवनसत्त्व आणि खनिजांची खाणच आहे. महागड्या टॉनिक्समधून जी जीवनसत्त्वे मिळतात त्यापेक्षा अनेक पटींनी पालेभाज्यांतून जीवनसत्वे मिळतात. दररोज किमान एक वाटी शिजवलेली पालेभाजी आहारात असावी. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, फायबर असते. त्या पचायला सुलभ असतात. पालेभाज्या करताना त्यात नेहमी डाळीचं पीठ, सोयापीठ, पनीर, दही घालावं किंवा बरोबर लिंबू खावे. पालेभाज्यांतून मिळणारे बीटा कॅरोटिन महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट आहे. जे कॅन्सरसारख्या आजारांना दूर ठेवते आणि हृदयरोगातही उपयुक्त ठरते.

पालेभाज्यांमधला चोथाही उपयुक्त आहे. पालेभाज्यांत उष्मांक कमी आणि चोथा अधिक असतो. हा चोथा बद्धकोष्ठता कमी करतो. वजन कमी करणाऱ्यांसाठी पालेभाज्या खूपच महत्वाच्या आहेत. पालेभाज्यांमध्ये सोडियम आणि पोटॅशियम भरपूर असल्याने ज्यांना किडनी विकार असतील त्यांनी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. महाराष्ट्रात बाराही महिने पालेभाज्या उपलब्ध असतात. मात्र, पालेभाज्या बनविण्यापूर्वी त्या स्वच्छ धूवून घेतल्या पाहिजेत. गरम पाण्यात मीठ आणि हळद घालून थोडा वेळ पालेभाज्या ठेवाव्यात आणि नंतर वापराव्यात. पालेभाज्या केल्यानंतर लगेचच खाव्यात. कडधान्ये, डाळी आणि शेंगदाणे घालून, दही लावून, चिंच, गूळ घालून, लसूण, मिरची, हिंगाची फोडणी घालून अशा अनेक प्रकारे पालेभाज्या करता येऊ शकतात.