खुशखबर ! ‘जन धन’ खात्यांमधील रकमेत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वसामान्य नगरीकांसाठी आणलेल्या जन धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यातील रकमेत सातत्याने वाढ होत असून आता लवकरच ही रक्कम १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार असल्याची माहिती मिळत आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३५.३९ कोटींपेक्षा अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत.

3 एप्रिलपर्यंत या खात्यांवर एकूण 97 हजार 665 कोटी रुपये शिल्लक होते. 27 मार्चपर्यंत हा आकडा 96 हजार 107 कोटी रुपये होता. तर त्याआधी आठवडाभरापूर्वी तो 95 हजार 382 कोटी रुपये खात्यांवर होते. आतापर्यंत सुमारे 27.89 कोटी खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड वितरित करण्यात आली आहेत.

विम्याच्या रकमेत वाढ

दरम्यान, योजनेच्या यशानंतर 28 ऑगस्ट 2018 नंतर खाते उघडलेल्या नागरिकांना मिळणारी अपघाती विम्याची रक्कम सरकारने 1 लाखांवरून 2 लाख रुपये केली असून, ओव्हर ड्राफ्टची मर्यादाही 10 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती. महिला खातेधारकांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असून, जवळपास 59 टक्के खातेधारक हे ग्रामीण व निमशहरी भागातील आहेत.

खाते उघडण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता

याकरिता पासपोर्ट, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, आधारकार्ड, राज्य शासनाने दिलेले नरेगाचे रोजगार कार्ड यांचा समावेश आहे. आधारकार्ड नसेल तर रेशनकार्ड, गॅझेटेड अधिकाऱ्याकडील पत्र, सरपंचांनी दिलेले ओळख प्रमाणपत्र, वीज किंवा टेलिफोन बील, जन्म किंवा विवाहाचे प्रमाणपत्र चालू शकतील.

एकाच बॅंकेच्या अन्य शाखेत खाते स्थलांतरित करताना कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसते. खातेधारक हा केवळ आपले पत्ता बदलाचे प्रतिज्ञापत्र देऊन खाते स्थलांतरित करू शकतो.