पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोथरुडच्या मैदानात, पुण्यातील 3 आमदारांचे तिकीट कापले, शिवसेनेला जागा नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित झाले असून शहरातील ८ पैकी ३ विद्यमान आमदारांना भाजपाने तिकीट नाकारले आहे.

विद्यमान आमदार दिलीप कांबळे (कॅटोंमेंट), मेधा कुलकर्णी (कोथरुड) आणि विजय काळे (शिवाजीनगर) यांचे तिकीट कापले असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपाच्या संसदीय समितीची बैठक झाली. त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांची तिकीटे निश्चित करण्यात आली. भाजपा शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर तातडीने भाजपाची यादी जाहीर करण्यात येणार असून उमेदवारांनाही लगेचच ए बी फॉर्म देण्यात येणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास आता सोमवारपासून केवळ ४ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना एक, दोन दिवसातच उमेदवारी यादी जाहीर करावी लागणार आहे.

भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ (पर्वती), चंद्रकांत पाटील (कोथरुड), महापौर मुक्ता टिळक (कसबा) भीमराव तापकीर (खडकवासला), योगेश टिळेकर (हडपसर), जगदिश मुळिक (वडगाव शेरी), सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर), सुनील कांबळे (कॅन्टोन्मेंट) याना भाजपची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांची अधिकृत घोषणा युतीच्या घोषणेनंतर होणार असल्याचे सांगण्यात येते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर, मुलुंड आणि कोथरुड असा पर्याय दिला होता. त्यांनी कोथरुडला पसंती दिली. कोथरुडमधून २०१४ मध्ये प्रथमच मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांचा तब्बल ६४ हजार मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कोथरुडमधून राज्यातील सर्वाधिक ९७ हजार ४१० मतांची आघाडी मिळाली होती. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात निवडणुक लढविण्यासाठी उमेदवारच नाही. आघाडीतील दोन्ही काँग्रेस ही जागा लढविण्यास तयार नाही. त्यामुळे त्यांनी ती मित्र पक्षांना सोडली आहे. अशा परिस्थितीत विरोधकांकडे उमेदवार नसल्याने व या मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेलाच ८० टक्के मते मिळत असल्याने युतीत हा मतदारसंघ राज्यात सर्वात सुरक्षित मानला जातो. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडला पसंती दिली आहे.

Visit : policenama.com