हायकोर्टाचा भाजपाला झटका ; ‘या’ राज्यात फेरनिवडणूक होणार

अहमदाबाद : वृत्‍तसंस्था – गुजरात हायकोर्टाने शुक्रवारी भारतीय जनता पार्टीला मोठा धक्‍का दिला आहे. भाजपा आमदार प्रभू माणेक यांचे सदस्यत्व गुजरातच्या हायकोर्टाने रद्द केले आहे. आमदार माणेक हे व्दारका विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत होते. माणेक यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने व्दारका मतदार संघात फेरनिवडणूक होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरताना भाजपा आमदार प्रभू माणेक यांनी चूक केली होती. त्यावर विरोधी पक्ष काँग्रेसच्या उमेदवाराने आक्षेप नोंदविला आणि गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेच्या सुनावणी दरम्यान गुजरात हायकोर्टाने आमदार प्रभू माणेक यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने व्दारका मतदार संघात फेरनिवडणूक घेण्याचे निर्देश देखील दिले आहेत. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. त्यातच हायकोर्टाने भाजपाच्या आमदाराचे सदस्यत्व रद्द केल्याने भाजपाला मोठा धक्‍का बसला आहे. व्दारका मतदार संघात विधानसभेसाठी आता कधी निवडणुक होईल हे आता पहावे लागणार आहे.