युतीच्या काळातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामध्ये उत्साहाच्या भरात काही काही नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. आधीच्या सरकारमध्ये ओम पुरीच्या गालासारखे रस्ते होते, आताच्या सरकारमध्ये हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते झाले आहेत. असे विधान शिवसेनेचे आमदार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. अमरावतीच्या लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, आधीच्या सरकारमध्ये ओम पुरीच्या गालासारखे रस्ते होते, आताच्या सरकारमध्ये हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते झाले आहेत.

भाजप-शिवसेना रिपाइं महायुतीच्या काळात एकही दंगा झाला नाही, काँग्रेसच्या काळात दर आठवड्यात दंगा व्हायचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात पुन्हा भगवा फडकवा, शिवसेना भाजप युतीला साथ द्या. ‘

अमरावतीतून नवनीत राणा यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली आहे . नवनीत राणा यांना काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सहकार्य करणार नाही त्यामुळे पुन्हा अमरावतीत आनंदराव अडसूळच विजयी होणार आहेत असा विश्वसही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

२०१४ मध्येही लोकसभा निवडणुकांमध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध लढल्या होत्या. १ लाख ३६ हजाराच्या फरकाने आनंदराव अडसूळ विजयी झाले होते.