पुण्यात सासऱ्यावर जावयाकडून ब्लेडने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीला भेटण्यासाठी आल्यानंतर तिच्यासोबत वाद घालणाऱ्या जावयाला समजावून सांगत असताना त्याने ब्लेडने वार केल्याची घटना पाषाण येथे रविवारी सकाळी ११:३० सुमारास घडली. याप्रकरणी जावयाविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू मारूती थोरात (३५, उरगंडे हातगाव, ता. आंबड, जि. जालना) असे त्याचे नाव आहे. तर कल्याण रमेश शेलार (५०, पाषाण) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू थोरात हा कल्याण शेलार यांचा जावई आहे. त्याच्यासोबत काही कारणावरून वाद झाल्याने शेलार यांची मुलगी त्यांच्याकडे मागील चार महिन्यांपासून राहण्यास आहे. तो तिला भेटण्यासाठी रविवारी पाषाण येथे आला होता. त्यानंतर तिच्यासोबत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याला शेलार हे समजावून सांगण्यासाठी मध्यस्थी करत होते. त्यावेळी त्याने शेलार यांना शिवीगाळ करत ब्लेडने वार करून त्यांना जखमी केले. पुढील तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.