लग्न समारंभात सामील झालेल्या 55 जणांमुळं तब्बल 177 झाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 8 जणांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ५ कोटी ८० लाख ४० हजारांवर गेली आहे, तर १३ लाख ८० हजार २५७ जणांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर, मास्कचा वापर करणे, असे आवाहन सतत करण्यात येते. पण तरीही काही जण नियम धाब्यावर बसवून, स्वतःसोबत दुसऱ्यांचा जीवसुद्धा टांगणीला लावत आहे. असाच काहीसा प्रकार अमेरिकेत समोर आला आहे. एका लग्नात ५५ जण सहभागी झाले असताना एकूण १७७ जणांना कोरोनाची बाधा झाली, तर ७ जणांचा मृत्यू झाला.

अमेरिकेतील आरोग्य संघटना ‘सेंटर फॉर डिजीज कंट्रोल’ने ने केलेल्या अभ्यासानुसार, येथील मेन राज्यात ७ ऑगस्टला एक विवाह सोहळा पार पडला. त्याच्या दुसऱ्याच्या दिवशी लग्नात आलेल्या एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती. लग्नात आलेल्या सर्व ५५ जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असता, त्यातील २७ जण कोरोना संसर्गित असल्याचे आढळून आले. तसेच एकाचा मृत्यू झाला होता. लग्नात हजेरी लावलेल्या पाहुण्यांनी सामाजिक अंतर तसेच मास्कचा वापर केला नव्हता.

लग्नाला उपस्थित असलेला एक जण दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांना भेटला. त्याचे वडील आरोग्य कर्मचारी होते. त्यांच्या संपर्कातून रुग्णालयातील ३८ कर्मचारी आणि इतर काही जण बाधित झाले. या सर्व व्यक्ती लग्न स्थळापासून १६० किलोमीटरच्या अंतरावर राहत होत्या. त्यातील एकही व्यक्ती लग्नास उपस्थित नव्हत्या. मात्र, त्यांच्यातील ६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला.

त्याचप्रमाणे लग्नात असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीला आठवड्यानंतर कोरोनाची लागण झाली. तो तुरुंगात कामाला होता. त्याच्या संपर्कात आल्याने १८ कर्मचारी आणि ४८ कैद्यांना कोरोना झाला, तर कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील १६ जणांना कोरोना संसर्गाची लागण झाली. लग्नाला आलेल्या पाहुण्यांची यादी यजमान मंडळींनी तयार केली नव्हती अथवा ती यादी आरोग्य यंत्रणेस दिली नाही, असे सीडीसीने आपल्या अहवालात सांगितलं.