परिस्थीतीने खूप काही शिकवलं : हार्दिक पंड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्येक माणूस हा चांगल्या-वाईट अनुभवांमधून बरेच काही शिकत असतो. त्याचप्रकारे मलाही परिस्थितीने बरेच काही शिकवले आहे, असं भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपले मनोगत पत्रकारांकडे व्यक्त केले. कॉफी विथ करण कार्यक्रमात महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या नंतर हार्दिकवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही काळासाठी निलंबन केले होते. त्यानंतर हार्दिकचे आता वर्ल्ड कप साठी च्या संघात निवड करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर त्याने आपले मन मोकळे केले आहे.

प्रत्येक माणूस हा चांगल्या-वाईट अनुभवांमधून बरेच काही शिकत असतो. त्याचप्रकारे मलाही परिस्थितीने बरेच काही शिकवले आहे. वादग्रस्त प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही काळ क्रिकेट थांबवावे लागल्यानंतर माझ्या मानसिकतेतही बराच फरक पडला असून त्याचा फायदा मला ‘आयपीएल’च्या सामन्यांमध्ये होत आहे, असं त्याने सांगितले.

बंदीच्या काळात मला माझ्या तंदुरुस्तीवर अधिक लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला. हा वेळ माझ्या मानसिकतेत बदल करणारा ठरला असून आता मी अधिक चांगल्या पद्धतीने खेळत आहे. मी परिस्थितीनुसार खेळ करण्यावर अधिक भर देत आहे. गेल्या चार वर्षांपासून माझ्यावर सोपवलेल्या भूमिकेनुसारच खेळण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही खेळात चलाख असाल आणि परिस्थितीचे आकलन झटकन करून त्यानुसार बदल करता येत असतील तर तुम्हाला अधिक प्रमाणात सामन्यांचे सकारात्मक निकाल मिळवता येतात, असंही त्याने सांगितलं.

दरम्यान, निलंबनानंतर पंड्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्याच्या खेळामूळे त्याची निवड करण्यात आल्याचे सर्वांचेच मत आहे. तसंच आयपीएलच्या सामन्यातही पंड्या मुंबईकडून खेळतो. यंदा आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाचा चांगली कामगिरी जमत नाही, मात्र पंड्याने त्याची कामगिरी चोख बजावली आहे.