कुस्तीपटू योगेश्‍वर दत्‍तचा भाजपमध्ये प्रवेश, कलम 370 आणि PM मोदींबद्दल सांगितली मनातील ‘भावना’

चंदीगड : वृत्तसंस्था – हरियाणामधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि हॉकीचा माजी कर्णधार संदीप सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या उपस्थितीत त्यांनी आज प्रवेश केला. योगेश्वर दत्त यांना गोहाना किंवा बडोदा येथून निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बुधवारी योगेश्वर दत्त यांनी सुभाष बराला यांची भेट घेतली होती आणि हरियाणा पोलिसातून निवृत्ती घेतल्याची माहिती दिली होती. तसेच स्वत: योगेश्वर दत्त यांनी म्हटले होते की ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि पक्षाने तिकीट दिल्यास ते नक्कीच निवडणूक लढवणार.

कलम 370 आणि पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना योगेश्वर दत्त म्हणाला की, ‘मला देशासाठी काम करण्याची इच्छा आहे. पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करून अशक्य शक्य केले आहे . मी त्याच्यावर खूप प्रभावित झालो आहे. कलम 370 रद्द केल्यामुळे देश आनंदी आहे.

योगेश्वर दत्त याने जर भाजपात प्रवेश केल्यामुळे हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फायदा होऊ शकतो. कारण, हरियाणामध्ये योगेश्वरचा मोठ्याप्रमाणावर चाहतावर्ग आहे. भाजपाने हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीत 90 पैकी 75 जागांवर विजयी होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

 

Visit : policenama.com