LIVE : हातकणंगलेमधून धैर्यशील माने ३० हजार मतांनी आघाडीवर

हातकणंगले : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. हातकणंगले मतदारसंघांतील मतमोजणीला सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विद्यमान खासदार राजू शेट्टी तर शिवसेनेकडून धैर्यशील माने यांच्यात प्रमुख लढत आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिवसेनेचे धैर्यशील माने हे ३०,०६६ मतांनी आघाडीवर आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजप सोबत लढून राजू शेट्टी यांनी खासदारकी मिळवली होती. हातकणंगले लोकसभा मतदार संघात एकूण १७ लाख ७२ हजार ५६३ मतदार आहेत. त्यापैकी राज्यात सर्वाधिक १२,४५,७९७ मतदारांनी मतदान केले.

सध्याची आकडेवारी
राजू शेट्टी(स्वाभिमानी शेतकरी संघटना ) – १,०२,९६७
धैर्यशील माने (शिवसेना )- १,३५,३९२

हातकणंगले मतदारसंघात सध्याचा कल हा शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्याकडे असे दिसून येत आहे. हा मतदार संघ पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. कारण हा संपूर्ण भाग साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. या मतदार संघात शेट्टींचे पारडे जड होते मात्र सध्याची आकडेवारी पाहता तरुण नेतृत्व म्हणून धैर्यशील माने आघाडीवर आहेत.

धैर्यशील यांच्या आई निवेदिता माने या पूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार होत्या. गेल्या वर्षी धैर्यशील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एक तरुण नेतृत्व म्हणून धैर्यशील माने यांच्या नावाचा विचार केला जात आहे. धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांच्या नावाचे प्रस्थ हातकणंगले आणि परिसरात आहे. त्यामुळे त्याचा फायदा धैर्यशील माने यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो असे बोलले जात आहे. दरम्यान २००९ मध्ये शेट्टी यांनीच धैर्यशील यांच्या मातोश्री निवेदिता माने यांना पराभवाची धुळ चारली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघात चुरस आहे.

२०१४ साली राजू शेट्टी हे भाजप शिवसेना युतीकडून लढले होते. २०१४ ची निवडणूक जिंकल्यानंतर काही दिवसात त्यांचे केंद्रातील मोदी सरकारशी बिनसले. मोदी यांची धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा हल्लाबोल शेट्टी यांनी चालू केला. त्यामुळे भाजप सेनेच्या समर्थकांची मते ही शिवसेनेलाच मिळतील असे बोलले जात होते. २०१४ साली राजु शेट्टी यांना ६ लाख ३९ हजार १९१ मते मिळाली होती. १ लाख ७७हजार ८१० मताधिक्यांनी ते विजयी झाले होते.