शेतात एकटीला गाठून दिराने भावजयीवरच केला अतिप्रसंग    

नांदेड – पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक घटना मरखेल पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या भुतनहिप्परगा या गावात घडली आहे. शेती कामाला गेलेल्या भावजयीवर दिरानेच शेतात अत्याचार केला. त्याचबरोबर या घटनेची कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रसंगात तिच्या परिवारातील सासू, सासरे, पती यापैकी कोणीही पीडितेच्या बाजूने उभे राहिलेले नाही. या प्रकरणी मरखेल पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुतहिप्परगा येथील पीडित महिला (२१) मे महिन्यामध्ये शेतात कामासाठी गेली असता. त्यावेळी तिचा चुलत दीर देखील शेतातच काम करत होता. आसपास कुणीच नसल्याचे पाहून त्याने संधी साधली आणि भावजयीला शेतातील झुडपात नेऊन अतिप्रसंग केला होता. याबाबद कोणाला काही सांगितल्यास तुला मारून टाकेल अशी धमकी देखील त्याने पीडितेला दिली.

महिलेने शेतात तिच्यासोबत झालेल्या प्रकारची माहिती आरोपीच्या आई-वडिलांना म्हणजेच तिच्या सासू सासऱ्यांना दिली. मात्र, त्यांनी बाजू ऐकून घेण्याऐवजी उलट पीडितेला धमकावले आणि म्हणाले हा प्रश्न आमच्या कुटुंबाच्या मानसन्मानाचा आहे. याबाबत कोणालाही काही सांगितल्यास तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही. महिलेचे कोणीच ऐकून न घेतल्याने तिने शेवटी याबाबाद परगावी गेलेल्या तिच्या नवऱ्याला सांगितले. परंतु त्याने देखील पत्नीच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याऐवजी भीतीपोटी परिवाराच्या विरोधात तक्रार करण्यास नकार दिला. पतीच्या या वर्तवणुकीमुळे दोघांत दुरावा निर्माण झाला. तक्रार करण्यास भिणाऱ्या नवऱ्यास महिलेने सोडून दिले. त्यानंतर पीडित महिला वडिलांकडे राहवयास गेली. रविवारी मरखेल ठाणे गाठून त्या महिलेने आपल्यावर झालेल्या अतिप्रसंगाची तक्रार दिली. पीडित महिलेच्या जबाबावरून आरोपी विक्की, सासरा व सासू रा.भुतनहिप्परगा यांच्या विरुद्ध मरखेल पोलिसांनी कलम ३७६ (२) एन, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड हे करीत आहेत. मात्र, आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.