आई राजा उदे उदे… ! शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ, ऑनलाईन दर्शनासह आरोग्याचा जागर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. परंतु कोरोनाच्या या संकटामध्ये यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. पुण्यामध्ये देखील विविध मंडळांनी हा नवरात्रोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये आज चतु:शृंगी मंदिर, तांबडी जोगेश्वरी, भवानी माता, महालक्ष्मी अशा शहरातील विविध मंदिरांमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सकाळी ७ ते ९ दरम्यान पूजा, अभिषेक आणि घटस्थापना असे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर यावर्षी भाविकांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. पुढील नऊ दिवस विविध मंडळांतर्फे आरोग्याचा जागरही केला जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यावर्षी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नवरात्र देखील अतिशय साधेपणाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे मंडळांनी देखील खबरदारी घेतली असून काही सार्वजनिक मंडळे ऑनलाईन लाईव्ह दर्शनाची सोय, तर काही मंडळे ऑनलाईन वेबसाईटवर फोटो उपलब्ध करून देणार आहेत. नवरात्रोत्सवात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. पुण्यातील ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये सकाळी सात वाजता महापूजा आणि घटस्थापना होणार आहे. देवीच्या दररोजच्या पूजेचे छायाचित्र संकेतस्थळावर भाविकांना पाहता येणार आहे. त्याचबरोबर मंदिराच्या बाहेरून भाविकांना देवीच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात शनिवारी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. क्षमा उपलेंचवार आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नीलेश उपलेंचवार यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.

दरम्यान, भवानी पेठेतील भवानी माता मंदिरामध्ये मुख्य विश्वस्त विनायक मेढेकर यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता महापूजा आणि घटस्थापना होणार आहे. त्याचबरोबर श्री सूक्त पठण, ललिता सहस्रानाम, अष्टमीला नवचंडी याग असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, असे विश्वस्त नरेंद्र मेढेकर यांनी सांगितले. चतु:शृंगी मंदिरामध्ये सकाळी नऊ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. नरेंद्र अनगळ यंदाच्या उत्सवाचे सालकरी आहेत. दररोज सकाळी दहा आणि रात्री साडेआठ वाजता आरती करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थानचे दिलीप अनगळ यांनी दिली. भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठी स्क्रीन लावण्यात येणार असून त्यावर भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत.