रूग्णांची लूट थांबवण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आरोग्य मंत्री टोपेंनी केली घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचं थैमान सुरु असताना सर्वांनी डॉक्टरांना कोरोना योद्ध्यांचा मान दिला आहे. मात्र, अद्याप काही हॉस्पिटलकडून रुग्णांकडून वाढीव बिले आकारली जात आहे. रुग्णांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यातील अशा रुग्णालयांना चाप बसावा यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी केली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी केलेल्या घोषणेमुळे रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. पुण्यातील रुग्णालयांकडून कोरोना उपचारांसाठी लावण्यात येणाऱ्या प्रत्येक बिलाचं ऑडिटरमार्फत ऑडिट केलं जाईल. तसेच आतापर्यंत फक्त दीड लाख रुपयांच्या वरच्या बिलांचंच ऑडिट केलं जात होतं. मात्र, आता, प्रत्येक बिलाचं ऑडिट केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

प्रत्येक बीलाचे ऑडिट करण्याच्या सूचना
यापूर्वी अशा प्रकारे रुग्णांची आर्थिक लूट केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार दीड लाखांच्या वर असलेल्या बीलाचे ऑडिटरमार्फत ऑडिट करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. परंतु त्यानंतर देखील काही रुग्णालयांनी त्यातून पळवाट काढल्याचे दिसून आले. यामध्ये दीड लाखांच्या वरची रक्कम असेल, तर ती दीड-दीड लाखांच्या स्वतंत्र बिलातून वसूल केली जात होती. त्याला आळा बसावा यासाठी आता प्रत्येक बीलाचं स्वतंत्र ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयात ऑडिटर असणं अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

पुण्यातील ही रुग्णालये सरकारच्या यादीत घेणार
यावेळी राजेश टोपे यांनी पुण्यात म्युकरमायकोसिसचे उपचार देणाऱ्या रुग्णालयांसंदर्भात देखील महत्त्वाची घोषणा केली. पुण्यातील रुबी, जहांगीरसारख्या रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे उपचार दिले जातात. मात्र, ही रुग्णालये सरकारच्या यादीत समाविष्ट नाहीत. त्यामुळे तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचारांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ही रुग्णालय देखील सरकारच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात पावले उचलण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.

पुण्यातील होम क्वारंटाईन कमी करणार
राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी राज्यात ज्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे अशा 18 जिल्ह्यांमध्ये होम क्वारंटाइन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रुग्णांना होम क्वारंटाईन न करता त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश होता. त्यानुसार पुण्यातील होम क्वरंटाईन हळूहळू कमी करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

हाय रिस्क आणि लो रिस्क चाचण्या व्हायला पाहिजेत
राज्यात कोरोना रुग्णांचं ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग वैज्ञानिक पद्धतीनेच व्हयला हवं, असं देखील राजेश टोपे यांनी यावेळी नमूद केलं. संपूर्ण महाराष्ट्रात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग वैज्ञानिक पद्धतीनेच करायला पाहिजे असं सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. आपण चौकात उभं राहून लोकांच्या चाचण्या करणं आणि त्यातून पॉझिटिव्हिटी रेट कमी करत आणणं हे आपल्याला करायचं नाही. हाय रिस्क आणि लो रिस्कमध्येच चाचण्या व्हायला हव्यात. चाचण्यांची संख्या अजिबात कमी होता कामा नये. पुणे चाचण्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
वाढती रुग्णसंख्या पाहता पुण्यात राज्य सरकारच्या निर्बंधांव्यतिरिक्त शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, आज घेतलेल्या निर्णयानुसार शनिवार आणि रविवार पुण्यातील अत्यावश्यक सेवांवर असणारे निर्बंध उठवण्यात आल्याचे, राजेश टोपे यांनी सांगितले.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय