राज्यात Lockdown लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असल्याने ठाकरे सरकार लॉकडाऊन लावतंय की अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन बाबत स्पष्टीकरण दिले आहे. “लॉकडाऊन सध्या कोणालाही नको आहे. मात्र, परिस्थिती उद्भवते तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदु शकत नाही. अचानक लॉकडाऊन लावणे शक्य नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो. मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबत चर्चा झाल्याचे,” टोपे यांनी सांगितल.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, “राज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सर्व क्षेत्राचा अभ्यास करुन लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेतला जातो. निर्बंध अधिक कडक करावे लागतात. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही, लोकांचा बिंधास्तपणा कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत आहे.”

“संसर्ग वाढला की रुग्णांना बेड मिळत नाही. शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊन करावे लागते. ICU आणि ऑक्सिजन बेडच्या संख्येबाबत तक्रारी आल्या की, लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. याबद्दल अभ्यास सुरु असून, काहींच्या मते लॉकडाऊन नको, पण सगळा विचार करुन मध्यबिंदू गाठून निर्णय घ्यावा लागेल,” असेही राजेश टोपे यांनी म्हटलं.

“प्रसार वाढल्याने काही शहरात बेडची उपलब्धता नाही हे मान्य आहे. मात्र, या क्षणाला रुग्णालयात बेड मिळतच नाही, असे नाही. काल झालेल्या बैठकीत खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेतले पाहिजे, ज्याने बेड कमी पडणार नाही. त्याचसोबत ८० टक्के ऑक्सिजन सिलेंडरचा वापर मेडिकल कारणांसाठी केला जावा,” असे निर्देश दिले असल्याचे यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले.