जीवनशैली जन्य रोगाचं प्रमाण वाढतय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशात निम्नस्तरातील लोकांमध्ये जीवनशैलीजन्य रोगांचं प्रमाण वाढत चाललं आहे. शिवाय, जीवनशैलीजन्य आजार लकवा मारणं, हृदयविकार होणं, मूत्रपिंड निकामी होणं, डोळे अधू होणं आदी जीवनास घातक विकृतीचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढत चाललं आहे. त्यामागची कारणं कळली तर त्यांचा प्रतिबंधही करता येऊ शकतो.

स्वाइन फ्लू वा बर्ड फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांमुळे होणारे मृत्यू तुलनेने कमी असले तरी वृत्तपत्रांमध्ये या मृत्यूंविषयी छापून येते, चर्चा होते, त्याचा गाजावाजा होतो. मात्र जीवनशैलीजन्य आजारामुळे लाखो नव्हे, तर कोट्यवधी लोक ग्रस्त असताना त्याकडे म्हणाव्या तितक्या गंभीरतेनं पाहिलं जात नाही. हे जीवनशैलीजन्य आजारांनी घातलेल्या भीषण विळख्याची समाजाला अजूनही तितकीशी कल्पना आलेली नाही, याचं द्योतक आहे.

अगदी आताआतापर्यंत जीवनशैलीजन्य आजार हे श्रीमंतांचे आजार आहेत, कारण त्यांची कारणं आपल्याला लागू होत नाहीत, असं जे आपल्याला वाटत होतं, तीच या आजारांना आमंत्रण देणारी कारणं आज मध्यमवर्गीयांबरोबरच गरिबांनाही लागू होऊ लागली आहेत, या कारणांमुळे आज तुमच्या कुटुंबांतही हृदयरोग, उच्च रक्तदाब वा मधुमेहानं ग्रस्त एकतरी व्यक्ती असेल.

जीवनशैलीजन्य आजारांबाबत चित्र असं आहे की, समाजाच्या सर्वांत वरच्या स्तरामधील लोकांनी आपल्या आहारामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करून या आजारांपासून हळूहळू दूर जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढे मध्यमवर्गामधील आणि निम्नस्तरामधील लोकांनाच जीवनशैलीजन्य आजार, हृदयरोग यांसारखे लोक त्रस्त करतील, नव्हे तशी सुरुवात झालीच आहे. ज्यामुळे भारतामधील संसर्गजन्य व इतर आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण १५ टक्क्यांनी कमी झालेले असताना जीवनशैलीजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मेरिका, ब्रिटन यांसारखे विकसित देश मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग अशा जीवनशैलीजन्य आजारांचा सामना करीत आहेत, तर सोमालिया-टांझानिया यांसारखे अविकसित देश संसर्गजन्य क्षय, एड्स, मलेरिया अशा आजारांशी लढत आहेत. भारत संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य अशा दुहेरी आजारांच्या कचाट्यात सापडला आहे.