पावसाळ्यात दूषित पाण्यामुळं पसरताहेत ‘हे’ गंभीर आजार ! ‘असा’ करा संसर्गापासून बचाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   गेल्या काही महिन्यांपासून आधीच लोक कोरोना व्हायरसमुळं चिंतीत आहेत. अशात साथीच्या आजारांनीही पावसाळ्यात तोंड वर काढलं आहे. सर्दी, ताप खोकला आला तरी लोक कोरोनामुळं लगेच घाबरत आहेत. पावसाळ्यात कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, टायफाईड, लेप्टोस्पायरोसिस अशा अनेक समस्या उद्भवतात. काहींना श्वास घ्यायला त्रास, सर्दी, अॅलर्जी अशाही समस्या येतात. परंतु या समस्या गरम पाण्याच्या सेवनानं नियंत्रित केल्या जाऊ शकतात. दूषित पाण्याचं सेवन करणं जर आपण टाळलं तरीही आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.

पावसाळ्यात अनेकदा दूषित पाण्याचा पुरवठा केला जातो. यामुळं उलट्या, अतिसार, टायफाई़ड आणि कावीळ असे अनेक साथीचे आजार होत असतात. पावसाळ्यात पाणी पिताना ते उकळून थंड केलेले असावे. पाणी गरम करून त्यांचं सेवन केल्यानं पाण्यातील जंतू नष्ट होतात.

पाणी साठवून ठेवणं शक्यतो टाळावं. पाण्याची भांडी, पाण्याच्या टाक्या, पाईप्स हे वेळोवेळी स्वच्छ करा. पाण्याची भांडीही झाकून ठेवायला हवीत. जर पाणी साठवून ठेवलं तर डासांची निर्मिती होते. डासांमुळं अस्वच्छता पसरते आणि यामुळं डेंग्यू, मलेरिया असे अनेक आजार पसरतात.

पावसाळ्यात अनेकदा ढगाळ वातावरण असतं. यामुळं पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. परिणामी जंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यामुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळं आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून पावसात भिजणं टाळायला हवं. पावसात जात असाल तर छत्री किंवा रेनकोटचा वापर नक्की करा. आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असे पदार्थ खावेत. आहार घेताना त्यात गाजर, आलं, लसूण, हळदीचं दूध असे पदार्थ असतील याकडे लक्ष असू द्या. हळदीत अँटी ऑक्सिडेंट्स गुणधर्म असतात. याशिवाय सर्दी आणि खोकल्यासाठी लसणाचा खूप फायदा होतो. ज्यांना श्वसनाची समस्या असेल अशा व्यक्तींनी आल्याचं सेवन नक्की करावं, यामुळं फायदा मिळेल. उन्हाळा असो किंवा पावसाळा पाण्याचं भरपूर सेवन करावं.

ज्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी आहे अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. व्हिटॅमिन डी घ्या. यासाठी कोवळं ऊन घ्या. जर बाहेर जाणं शक्य नसेल तर इमारतीच्या गच्चीवरून किंवा गॅलरीतून सूर्य प्रकाश घेऊ शकता. कारण लॉकडाऊनमुळं अनेकांना व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवत आहे. बाहेर जाणं शक्य नसेल तर किमान घरीच काही वर्कआऊट करा. जर रोज व्यायाम केला तर आरोग्य चांगलं राहिल आणि वजनही वाढणार नाही.

याशिवाय तुमची रोगप्रतिकारक शक्तीही चांगली राहिल. शरीरही ताजंतवानं राहतं आणि झोपही चांगली येते. जास्तीत जास्त गरम पाण्याचं सेवन करा. यामुळं घशासंबंधित तक्रारी उद्भवणार नाहीत. बाहेर जात असाल तर मास्कचा वापर करा आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.