Coronavirus : उष्णतेनं ‘कोरोना’ व्हायरसचा प्रसार कमी होईल पण तो ‘नष्ट’ होणार नाही

पोलिसनामा ऑनलाईन – उष्ण वातावरणामुळे कोरोनाचा प्रसार कमी होण्याची शक्यता असली, तरी हा विषाणू नष्ट होईल असे समजणे चुकीचे आहे, असे मत भारतीय विषाणूरोगतज्ज्ञाने व्यक्त केले आहे. भारतात सध्या उन्हाळा सुरू असल्याने विषाणूचा प्रसार जास्त तापमान व आर्द्र हवामान यामुळे कमी होण्याची शक्यता आहे. शिव नाडर विद्यापीठाच्या जीवविज्ञान विभागाचे सहायक प्राध्यापक विषाणूतज्ज्ञ नागा सुरेश वीरापू यांच्या मते कोरोना विषाणूचा प्रसार हा हवामानानुसार कमी-जास्त होत नसतो.

हवामान व पर्यावरणातील इतर बदलांमुळे सार्स सीओव्ही 2 विषाणू नष्ट होण्याची शक्यता वर्तवणे खूप घाईचे ठरणार आहे. जास्त तपमानाने विषाणूचा प्रसार कमी होईल हे म्हणणे योग्य वाटत असले तरी उन्हाळ्यामुळे तो विषाणू नष्ट होईल असे गृहीत धरणे चुकीचे आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी असे म्हटले होते की, उष्ण व आर्द्र हवामानामुळे विषाणूच्या प्रसाराचा वेग कमी होतो. त्यामुळे आशियायी देशात मोसमी पाऊस सुरू होणार असल्याने विषाणूचा प्रसार कमी होऊ शकतो.

ट्रम्प प्रशासनाने असे जाहीर केले होते की, सूर्यप्रकाश, उष्णता, आर्द्रता यामुळे विषाणूच्या प्रसारास अनुकूल स्थिती राहणार नाही. नंतर एका देशाच्या अहवालानुसार तपमान व अक्षांश-रेखांश यांचा कोरोनाच्या प्रसाराशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान लॉकडाउनमुळे शाळा बंद ठेवणे व इतर उपाययोजनांचा सार्वजनिक आरोग्यासाठी फायदाच झाला आहे. उष्ण हवामानाने कोरोनाचा प्रसार कमी होऊ शकतो पण त्यातून हा विषाणू नष्ट होणार नाही. प्रसार कमी होण्याच्या काळाचा भारताने इतर उपाययोजनांचा वापर केला पाहिजे. त्यामुळे देशातील करोनाचा आलेख सपाट होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय सुरू ठेवले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.