home page top 1

मुसळधार पावसाने केला ‘कहर’, जनजीवन विस्कळीत आणि सर्वत्र पाणीच पाणी

पुणे : (लोणी काळभोर) पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारी मध्यरात्रीनंतर हवेलीतील बहुतेक सर्वच भागात मुसळधार पावसाने कहर केला असून शेती पिकासह जनजीवन बाधीत झाले आहे. परतीचा पाऊस महाराष्ट्रातून बाहेर पडताना तुफान राडा करत सर्वत्र धुवांधार पर्जन्यवृष्टी होत आहे. आज मंगळवारी पहाटे तीन वाजल्यापासून तब्बल तीन तास मुसळधार पावसाने या भागाला अक्षरशः झोडपून काढले आहे. थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, सोरतापवाडी, शिंदवणे, तरडे, वळती, उरुळी कांचन आदी गावात जोरदार पाऊस पडला.

कोलवडी, केसनंद, मांजरी खुर्द, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, नायगाव, पेठ, सोरतापवाडी या भागातील सरकारी ओढ्यांना अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे. गुंठेवारीमध्ये एका गुंठ्याला साधारणपणे सात ते आठ लाख रुपये भाव मिळत असल्याने हवेलीतील डेव्हलपर्सची वक्रदृष्टी शासकीय ओढे नाले व कॅनालचे पाट यावर पडल्याने मोठ्या पूरपरिस्थितीचा फटका हवेलीतील शेतकऱ्यांना बसला असून गावनकाशातील जुने ओढे नाले पूर्ववत करण्याची मागणी कोलवडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब गायकवाड यांनी केली आहे.

कोलवडी व केसनंद गावच्या शिवेवरील असलेल्या सरकारी ओढ्यांवर प्लाॅटींगधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे येथील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून बऱ्याच ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यातच प्रशासकीय यंत्रणा निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने हवेलीच्या पुर्व भागांमध्ये पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करणेकामी कोणतेही शासकीय अधिकारी व कर्मचारी फिरकलेच नाही. कोलवडी येथील गट नंबर १३६५ व गट नंबर १३६९ ह्या गटाला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच येथील तलाठी व मंडलाधिकारी यांनी या भागाचा पंचनामा केला असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.

या अतिक्रमणावर महसूल खात्याने आजपर्यंत का कारवाई केली नाही याबद्दल परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे याचा त्रास मात्र शेतकरी वर्गास भोगावा लागतो आहे. आज पावसाने कहर केल्याने कुंजीरवाडी येथे ओढ्याचे पाणी चक्क पुणे सोलापूर महामार्गावर आले. यावरुन या ओढ्यातही किती अतिक्रमण झाले आहे याची कल्पना येते.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like