महाविकास आघाडीच्या हेमलता बडेकर हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी

उरुळी कांचन (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन –  हवेली पंचायत समितीचे यापूर्वीचे उपसभापती युगंधर उर्फ सनी मोहन काळभोर यांनी एक महिन्यापूर्वी उपसभापतीचा पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज हवेली पंचायत समितीच्या महात्मा गांधी हॉलमध्ये झालेल्या उपसभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हेमलता बाळासाहेब बडेकर यांची बहुमताने निवड झाली. हेमलता बडेकर यांनी भाजपाचे पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध यादव यांचा पराभव केला आहे.

हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. त्यात महाविकास आघाडीच्या वतीने हेमलता बडेकर यांनी तर भाजपातर्फे अनिरुद्ध यादव यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अर्ज माघारी घेण्याच्या कालावधीत दोघांचे अर्ज राहिल्याने, मतदान घेतले गेले. त्यात हेमलता बडेकर यांना सोळा तर अनिरुद्ध यादव यांना तीन मते मिळाल्याने उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी हेमलता बडेकर यांची उपसभापती निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

हवेली पंचायत समितीत २० सदस्य असून, अजिंक्य घुले यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे. वीसपैकी १० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तर सहा शिवसेना व तीन सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने, हवेली पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने हेमलता बडेकर यांच्या रुपात एकाच उमदेवार उभा केला होता. तर भाजपाने अनिरुद्ध यादव यांना निवडणुकीत उतरवले होते. त्यामुळे हेमलता बडेकर व अनिरुद्ध यादव यांच्यात झालेल्या लढतीत हेमलता बडेकर यांनी सोळा विरुद्ध तीन अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला.

दरम्यान, हेमलता बडेकर यांची निवड होताच आमदार अशोक पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख माउली कटके, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक व न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती हेमलता काळोखे, माजी उपसभापती सनी काळभोर, पंचायत समिती सदस्य दिनकर हरपळे, अनिल टिळेकर, माजी जिल्हा परीषद सदस्य रमेश कोंडे, रमेश मेमाने आदी उपस्थित होते.