तळेगावातून तब्बल सहा किलो गांजा जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विक्रीसाठी आणलेला सहा किलो २४० ग्रॅम वजनाचा गांजा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवार पेठ, तळेगाव दाभाडे येथे जप्त केला आहे.
रोहित आण्णा शिंदे (४१, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिस हवालदार प्रदीप शेलार यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील मंगळवार पेठेत सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती संशयितरित्या थांबली असून त्या व्यक्तीकडे गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रोहित याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडे एक लाख ५६ हजार रुपये किमतीचा सहा किलो २४० ग्रॅम वजनाचा गांजा आणि ७२० रुपयांची रोकड मिळून आली.

पोलिसांनी सर्व ऐवज जप्त करत त्याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आरोपी रोहित याने हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.