पतीचे कारागृहात अन् खासदार नवनीत राणाचे कारागृहाबाहेर आंदोलन

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – ऐन दिवाळीच्या दिवशी अमरावतीमध्ये (Amravati) खासदार पत्नी आणि आमदार पतीचे आंदोलन चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे, तर दुसरीकडे कारागृहाबाहेर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शनिवारी दुपारी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आमदार रवी राणा यांनी जामीन नाकारल्यामुळे शेतकरी आणि कार्यकर्त्यांसह त्यांची अमरावती कारागृहात रवानगी केली आहे. आमदार रवी राणा यांना भेटू न दिल्याने खासदार राणा यांनी कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आमदार राणा यांची भेट होणार नाही. तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार असा पवित्रा नवनीत राणा यांनी घेतला आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी व लॉकडाउन काळात आलेली वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी शुक्रवारी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी रवी राणा यांच्यासह 110 शेतकरी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक झाली होती.

कारागृहात अन्नत्याग आंदोलन
अटक केल्यानंतर शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास राणा यांच्यासह 20 शेतकऱ्यांना न्यायालयात हजर केले. मात्र, आमदार राणा यांनी न्यायालयात जामीन नाकारला. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री न्यायालय सुरू ठेवले होते. या सर्व आंदोलनकर्त्यांची अमरावती येथील कारागृहात रवानगी केली आहे. कारागृहातच आता राणा आणि त्यांच्या सर्व आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

शेतक-यांची दिवाळी काळी करणा-या ठाकरे सरकारचा निषेध : फडणवीस
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून रवी राणा यांच्या अटकेबद्दल ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आमदार रवी राणा यांनी जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो, असे फडणवीस म्हणाले आहेत.