इंदापूर : लोणीदेवकर नजिक 2 अट्टल गुन्हेगारांना सिनेस्टाईलनं अटक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – लोणी देवकर, ता. इंदापूर येथील पूणे- सोलापूर महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गाच्या गस्ती पथकाने दीड किलोमीटर सिनेस्टाईलने चारजणांचा पाठलाग करून त्यातील दोन अट्टल दरोडेखोरांना पकडून इंदापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

महामार्गाचे गस्ती पथकातील अशोक नागरगोजे आणि अमोल ठोंबरे हे मध्यरात्रीच्या सुमारास पूणे- सोलापूर महामार्गावर इंदापूर हद्दीत गस्त घालीत असताना लोणी देवकर नजीकच्या सर्व्हिस रस्त्यावर एक बिगर नंबरचे चार चाकी वाहन उभे असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी त्याठिकाणी गाडीजवळ जाऊन पहिले असता चार इसम दारू पित असल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या हालचाली महामार्ग गस्ती पथकातील महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी गस्ती पथकाची नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतर गेल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेता शेजारी आपले वाहन थांबवून गाडीतुन उतरून पळ काढला.

गस्ती पथकाने त्यांचा अंधार्‍या रात्री सिनेस्टाईलने पाठलाग करून त्यातील दोन इसमांना पकडण्यात जवानांना यश आले. याबाबत कर्तव्यावर असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे इन्चार्ज नवनाथ फराटे यांनी तात्काळ इंदापूर पोलीस ठाणे आणि डाळज पोलीस चौकी यांना कळविले. तात्काळ पोलीस पथक घटना घडल्याच्या ठिकाणी पोहचले. पकडलेल्या त्या इसमांच्या वाहनांची झाडाझडती घेतली असता वाहनातील एका पिशवीमध्ये मौल्यवान दागिने, दारूच्या बाटल्या, महागडे मोबाईल आणि शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी आशिष भिसे (वय २५ वर्षे, रा. मार्केट यार्ड, पुणे) आणि सुनील गायकवाड (वय २५ वर्षे, रा.बिबवेवाडी, पुणे) यांनी यापूर्वी कुठे जबरी चोरी केली आहे का किंवा कुठे प्राणघातक कृती केले आहे का याबाबत देखील पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सुरक्षा बलाच्या जवानांचे सर्व स्तरातुन कौतुक
सुरक्षा बलाचे जवान महामार्गाच्या गस्ती पथकामध्ये रात्रीच्यावेळी गस्त घालीत असताना यापूर्वी देखील त्यांनी इंदापूर तालुक्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळ्यांना पकडून दिले आहे. तसेच अपघात समयी तत्परतेने हजर राहून जखमींना मदत केली आहे त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/