हिंजवडी : व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची पेटवून घेऊन आत्महत्या

हिंडवडी : पोलीसनामा ऑनलाईन

व्यसनी पतीकडून होणा-या वारंवार त्रासाला कंटाळून पत्नीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१४) रात्री अकराच्या सुमरासा म्हळुंगे येथे घडली. याप्रकरणी पती विरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा लहू तावरे (३२, रा. म्हाळुंगे, मुळशी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुमीत लक्ष्मण जगताप (२८, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लहू एकनाथ तावरे या व्यसनी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहू तावरे याला दारूचे व जुगार खेळण्याचे व्यसन आहे. लहू दारूच्या नशेत पत्नी पुजाला मारहाण करीत होता. तसेच माहेराहून पैसे आणण्यासाठी त्याने तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून पूजाने राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.