‘अमित शहांच्या पायगुणाने ठाकरे सरकार जावं आणि…’ – नारायण राणे

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच कोकण दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या कोकण दौऱ्यावर भाष्य करताना माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत. त्यांच्या पायगुणानं ठाकरे सरकार जावं आणि चांगलं सरकार यावं अशी मी प्रार्थना करेन असं नारायण राणे म्हणाले आहेत. ठाकरे सरकारमुळं महाराष्ट्र मागे चाललाय अशी टीकाही त्यांनी केली आहे. शनिवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे मेडिकल कॉलेजचं रविवार दि 7 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे. अमित शाह यांच्या हस्ते या कॉलेजचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी अमित शाह सिंधुदुर्गात येणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत अमित शाह यांच्या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे. 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.50 वाजता अमित शाह गोवा येथून हेलिकॉप्टरनं पडवे मेडिकल कॉलेज येथे थांबणार आहेत.

शाह यांच्या दौऱ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण तसंच अनेक आमदार, खासदार आणि भाजपचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.