प्रामाणिक रिक्षा चालकाने परत केले सोन्याचे गंठण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंतामणी चौक ते रेल्वे स्टेशन रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षात विसरलेल्या बॅगेतील पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण प्रामाणिक रिक्षा चालकाने पोलिसांकडे परत केले आहे. चिंचवड पोलिसांनी रिक्षा चालकाचे आभार मानून त्यांचा सन्मान केला.

भरत कुंडलिक जाधव (रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी एक महिला जाधव यांच्या रिक्षात चिंतामणी चौक येथे बसल्या आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे उतरल्या. महिलेकडे असलेली कपड्याची बॅग त्यांनी सीटच्या मागील बाजूला टाकली. गडबडीत उतरताना त्या बॅग घेणे विसरल्या. जाधव हे रिक्षा घेऊन पुढील भाड्यासाठी निघून गेले.

बॅग विसरल्याची लक्षात आली त्यावेळी रिक्षा निघून गेली होती. महिलेने अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र रिक्षा सापडला नाही. अखेर महिलेने निगडी पोलिसांकडे दिली. जाधव हे रात्री दगडूशेठ गणपती येथे भाडे घेऊन गेले होते. त्यानंतर आज सकाळी नेहमी प्रमाणे ते रिक्षा घेऊन कामाला जात असताना, साफ सफाई करताना त्यांना बॅग दिसली. त्यांनी लगेच बॅग चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भिमराव शिंगाडे यांच्याकडे दिली. शिंगाडे यांनी बॅग तपासली असता त्यामध्ये महिलेचे पाच तोळे वजनाचे गंठण मिळाले. शिंगाडे यांनी जाधव यांच्या प्रमाणिकता बद्द्ल कौतुक करुन सन्मान केला.