अहमदनगरमध्ये ऑनर किलिंग ? विहिरीत आढळला 12 वीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –   एका बारावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे घडली असून मुक्ता वारे असे या मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सरु केला आहे. ही घटना ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच तरुणीने आत्महत्या केली आहे का त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील मुक्ता वारे ही विद्यार्थिनी गुरुवार दुपारपासून बेपत्ता झाली होती. शुक्रवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार तिचे आजोबा शहाजी यादव यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दिली होती. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बेपत्ता मुक्ताचा मृतदेह डोणगाव शिवारातील अशोक यादव या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत आढळून आला.

मुक्ता वारेचे वडील संभाजी वारे यांनी जामखेड पोलिसांना सांगितले की, मृत मुक्ता ही लहानपणापासून डोणगाव या आपल्या आजोळी राहण्यास होती. तिने यावर्षी 12वीची परीक्षा दिली होती. तिचे मूळ गाव जामखेड तालुक्यातील रत्नापूर आहे.

विहिरीतून मृत तरुणीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण आरोग्य रुग्णालयात पाठवून देण्यात आला. या विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास जामखेड पोलीस करीत आहेत. जाखमखेड पोलिसांनी या प्रकरणात डोणगाव अरणगाव परिसरातून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे.