धक्कादायक ! आरोग्य सेविकाचा गळा आवळून खून

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोग्य सेविका स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. परंतु, यातीलच एका आरोग्य सेविकेचा तिचा पतिने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शैलजा अरविंद पाटील असे खून झालेल्या आरोग्य सेविकेचे नाव आहे. याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी पतीला अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे येथील आरोग्य सेविका शैलजा पाटील यांचा घरगुती वादातून पती अरविंद पाटील याने दोरीने गळा आवळून खून केला. पतीनेच याबाबत पोलिसांना माहिती देऊन खुनाची कबूली दिली. मुळच्या पन्हाळा तालुक्यातील माले येथील आणि सध्या शाहूवाडी तालुक्यातील माण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सावर्डे उपकेंद्रात आरोग्यसेविका म्हणून शैलजा पाटील कर्यरत होत्या.

गुरुवारी (दि. 28) रात्री पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरु झाले. वाद टोकाला गेल्याने मध्यरात्री पतीने शैलजा हिचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर आज (शुक्रवार) सकाळी पतीने शाहुवाडी पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घतेली. मृतदेह मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
शैलजा आणि अरविदं यांना दोन मुलं आहेत. हर्ष (वय-10) आणि राजवर्धन (वय-6) अशी दोन मुलं आहे. हर्ष इयत्ता चौथीत तर राजवर्धन यंदा पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणार होता. पती अरविंद हा शाहूवाडी, मलकापूर आणि बांबवडे या ठिकाणी आठवडे बाजारात लिंबू विक्रीचा व्यवसाय करतो. पुढील तपास शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले व सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख करत आहेत.