पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर तपासणाऱ्या निलंबित अधिकाऱ्याचे ‘हे’ आहे म्हणणे

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. एखाद्या आयएएस अधिकाऱ्याला निलंबित करण्यापूर्वी शासनाच्या नियमानुसार काही गोष्टीची पुर्तता करावी लागते. अशा कोणत्याच गोष्टी केल्या गेल्या नाहीत. त्यावर उद्विग्न झालेल्या या अधिकाऱ्याने मी माझे कर्तव्य पार पाडत होतो. मात्र मला निलंबित करण्यात आले. मी अंधारात लढाई लढत आहे. या विरोधात मी न्यायालयात दाद मागणार आहे, असे मोहम्मद मोहसिन यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात १७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. त्यावेळी १९९६ मधील बॅचचे आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांनी पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना सभास्थानी पोहचण्यास १५ मिनिटांचा उशीर झाला होता. त्यामुळे मोहम्मद मोहसिन यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश निघाले. कधी नाहीत ते निवडणूक आयोगाला अचानक जाग आली. त्यांनी याप्रकरणी दोन दिवसात अहवाल देण्याचा आदेश दिला होता. मात्र, एकाच दिवसात अहवाल मागवून त्याच दिवशी मोहसिन यांना निलंबित करण्याचा आदेश काढण्यात आला होता. त्यांच्यावर एसपीजी सुरक्षेतील महत्वाच्या व्यक्तीची अशा प्रकारच्या तपासणीपासून मुक्त असतानाही त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना निलंबित करण्यात आले होते.

केंद्रीय प्रशासनिक ट्रिब्युनलने मोहसिन यांच्या निलंबनाला स्थगिती दिली आहे. मात्र, निवडणुक आयोगाने त्यांच्याविरोधात नियम मोडल्याबद्दल कारवाइ करण्याची सूचना केली आहे.

यावर बोलताना मोहसिन यांनी सांगितले की, मी माझे काम करत असताना मला निलंबित केले. या संबंधातील एकही अहवाल मला देण्यात आलेला नाही. मी अंधारात लढाई लढत आहे.

विरोधी पक्षांनी असा कोणताही नियम नसल्याचा आरोप केला आहे. निवडणुक काळात अशा प्रकारे कोणाची तपासणी करु शकत नाही असा कोणताही नियम नाही. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेही हेलिकॉप्टर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासले होते. तसेच केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांचेही हेलिकॉप्टर संबलपूरमध्ये तपासण्यात आले होते.