मी पंतप्रधानपदाचा छुपा उमेदवार नाही, गडकरींनी चर्चांना दिला पूर्णविराम

नवी दिल्ली : मी पंतप्रधानपदाचा छुपा उमेदवार नसल्याचे सांगत नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील असे स्पष्ट केले. नितीन गडकरी यांनी पंतप्रधान होण्याच्या चर्चेला पूर्णविराम देताना म्हणाले, माझी पंतप्रधान बनण्याची इच्छाही नाही आणि स्वप्नही नाही, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले.

भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर गडकरी यांना पंतप्रधान केले जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. मात्र गडकरी यांनी असे काहीही नसल्याचे सांगत मोदीच पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट केले. नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळणार असून मोदी हेच पंतप्रधान बनणार आहेत. आम्ही एनडीएचे सरकार बनवतोय एकट्या भाजपाचे नाही, असे गडकरी यांनी सांगितले.

ओडिशा, पश्चिम बंगाल आणि केरळमधून भाजपला जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकारणात नेहमी दोन अधिक दोन चार नसतात. ही समीकरणं अंकगणितावर आधारलेली नसतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं. नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या शाब्दीक हल्ल्याबदल बोलताना ते म्हणाले, मोदींना काँग्रेसने अनेकदा चोर म्हटले. निवडणुकीत क्रियेवर प्रतिक्रिया येणारच.