अभिनेता सिध्दार्थला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमातील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थने एक ट्विट करत त्याचा फोन नंबर लीक झाला असून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे सांगितले आहे. इतकेच नाही तर अतिशय असभ्य भाषेत बोलले जात असून शिव्या घातल्या जात आहेत. या सर्वामागे तमिळनाडूमधील भाजपच्या आयटी सेलचा हात असल्याचा आरोप सिध्दार्थने केला आहे. सिद्धार्थने त्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केले आहे. तसेच अशा धमक्यामुळे मी अजिबात घाबरणारा नाही. मी गप्प बसणार नाही, प्रयत्न करत राहणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी ट्विट केले होते. त्यानंतर त्याला तामिळनाडू भाजप सदस्यांकडून असे धमकवण्याचे कॉल येत आहेत. सोशल मीडियावर त्याने घडलेला प्रकाराचा ट्विटच्या माध्यमातून खुलासा केला आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. गेल्या 24 तासात 500 हून अधिक कॉल आले आहेत. यातून मला अतिशय असभ्य भाषेत बोलले जात असून शिव्या घातल्याचे त्याने सांगितले. यात तमिळनाडूतील भाजपच्या आयटी सेलचा हात असल्याचा आरोप त्यांने केला आहे माझा नंबर लीक केला आहे. फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत पोलिसांकडेही तक्रार दाखल केली आहे. लोकांना माझ्यावर हल्ला करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. आपण कोरोना विरोधातील लढाई जिंकू पण अशा वृत्तीच्या लोकांपासून कसे सुरक्षित राहणार असा सवालही त्याने केला आहे.