नागपुरातून लोकसभेचा मीच उमेदवार; आशिष देशमुखांचा दावा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातील उमेदवारी माझीच असेल, असा दावा काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख भाजपकडून निवडूण आले होते. मात्र काही महिन्यांपुर्वीच देशमुखांनी भाजपला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेस प्रवेशानंतर आशिष देशमुखांनी संधी मिळेल तेव्हा भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा इशारा दिला. काँग्रेस पक्ष हे माझे घर आहे. मी भाजपामध्ये गेलो होतो ही चूक होती. परंतु आता मी काँग्रेसमध्ये परत आलो आहे. मला नागपूरमधून काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळेल. नागपूर लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ आहे. यामुळे मला काँग्रेसची नागपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळेल, असं देशमुख यांनी म्हटलं. तसंच नागपूरमधून काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी निवडून येईल, असा दावाही आशिष देशमुख यांनी यावेळी केला.

दरम्यान, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघात काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांचा दारुण पराभव झाला होता. आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी २ लाख ८५ मतांनी विजय मिळवला. यावेळी  गडकरींना ५४.१७टक्के मतं मिळाली होती. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा हा सर्वात मोठा विजय होता. त्यामुळे आशिष देशमुख यांना उमेदवारी मिळाली तर ते नितीन गडकरींचा सामना करतील. परंतु देशमुख गडकरींवर मात करतील का?, हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.