‘तिने’ डाऊन सिंड्रोमचाही केला पराभव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात राहणाऱ्या २० वर्षीय मनाली शेळकेने दुबईला झालेल्या विशेष ऑलिम्पिकमध्ये पॉवर-लिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. ती डाऊन सिंड्रोमने ग्रस्त आहे. या आजारावर मात करत तिने हे यश संपादन केलं आहे. मनालीचे अनेकांनी कौतूक केल्याने सध्या तिचा आनंद द्विगुणित झालाय. मेडल जिंकल्याच्या आनंदापेक्षा कौतुकाने तिचा आनंद अधिक वाढला आहे. मनालीने फक्त गोल्ड मेडलचं न्वहे तर त्यासोबत तिने तीन ब्राँझ मेडल्सही पटाकावत देशाचं नाव उंचावलं आहे.

मनालीला खेळ खेळण्याची आवड असून तिने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर थेट विशेष ऑलिम्पिकच्या ४ पदकांना गवसणी घातली आहे. तिच्या या जिद्दीपुढे डाऊन सिंड्रोमला देखील हार पत्करावी लागली आहे. मनालीचे पालक म्हणतात, इतर पालकांप्रमाणे आम्ही देखील मुलीला डाऊन सिंड्रोम आहे या विचाराने तिच्या जन्मानंतर जवळपास २ वर्ष चिंतेत होतो. आमच्यासमोर मनालीचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न होता. मात्र त्यानंतर आम्ही आहे ती परिस्थिती स्विकारायचं ठरवलं.

त्यानुसार मनालीला पुण्यातील कामायनी या विशेष मुलांच्या शाळेत घातलं. लहानपणापासूनच मनालीला टीव्ही लावून डान्स आणि खेळ पाहण्याची आवड होती. त्यामुळे आम्ही तिला कथकचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. मात्र कथकसाठी तिसऱ्या वर्षी लेखी परिक्षा असल्याने मनालीला ते जमणं शक्य नव्हतं. त्यानंतर मनालीच्या शिक्षकांनी आम्हाला ती जीममध्ये डंबेल्स उचलून देत असल्याचं सांगितलं. आणि त्यानंतर आम्ही तिला पॉवरलिफ्टींगमध्ये प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. त्यानुसार २०१७ मार्च पासून तिला यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर मनाली खेळली आणि तिची विशेष ऑलिम्पिकमध्ये निवड करण्यात आली.

डाऊन सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या मुलांकडे अजूनही पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा असतो. मात्र मनालीने तिच्या कर्तृत्वाने अशा मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला आहे. ही मुलं देखील इतर मुलांप्रमाणे काम करू शकतात, खेळू शकतात हे तिने समाजाला पटवून दिलं आहे. या मुलांना फक्त कौतुकाची थाप हवी असते आणि त्यातच त्यांचा आनंद असतो. त्यामुळे ज्या मुलांना डाऊन qसड्रोम आहे अशा मुलांच्या पालकांनी त्यांना समाजापासून दूर ठेऊ नये. त्यांना इतर मुलांप्रमाणे वागवलं पाहिजे.